सहा सदस्यीय समितीच्या रचनेवर प्रश्न; आदेशाची प्रत व सदस्यांची माहिती जाहीर करण्याची विनोद तेलंगे यांची मागणी
प्रतिनिधी /बोल महाराष्ट्र
**उदगीर :** शहरातील शासकीय सेवेत कार्यरत काही वैद्यकीय अधिकारी खासगी वैद्यकीय प्रॅक्टिस करीत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर गठीत करण्यात आलेल्या सहा सदस्यीय चौकशी समितीची चौकशी प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि स्वतंत्र पद्धतीने राबवावी, अशी मागणी प्रहारचे उपजिल्हा प्रमुख विनोद भगवानराव तेलंगे यांनी केली आहे.
दि. ७ सप्टेंबर रोजी दैनिक पुण्यनगरीमध्ये प्रसिद्ध झालेल्या **‘उदगीरात खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या सरकारी डॉक्टरांची होणार तपासणी!’** या वृत्ताचा संदर्भ देत तेलंगे यांनी उपजिल्हाधिकारी, उदगीर यांच्याकडे निवेदन सादर केले.
चौकशी समितीचा अधिकृत आदेश, समितीतील सहाही सदस्यांची नावे व पदनाम, अध्यक्षाचे नाव, चौकशीचे अधिकारक्षेत्र तसेच अहवाल सादर करण्याची मुदत जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
NPA घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची ड्युटी, बायोमेट्रिक हजेरी, OPD/IPD नोंदी, ड्युटी रजिस्टर, रजा नोंदी तसेच संबंधित शासकीय अभिलेखांची सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
**‘डॉक्टरांची चौकशी डॉक्टरांकडूनच होत असल्यास निष्पक्षतेबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतो,’** असा मुद्दा उपस्थित करत समितीत महसूल अथवा प्रशासकीय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी तेलंगे यांनी केली आहे.
चौकशीदरम्यान नियमभंग आढळून आल्यास लागू नियमांनुसार NPAची वसुली तसेच संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करावी. यासोबतच चौकशी अहवालानंतर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहितीही पारदर्शकपणे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
**“चौकशी समिती गठीत केली एवढ्यावर विषय थांबता कामा नये; चौकशीची प्रक्रिया आणि अंतिम निष्कर्ष जनतेसमोर पारदर्शक असणे आवश्यक आहे,”** असे विनोद तेलंगे यांनी म्हटले आहे.
