**लातूर :** शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठी चालविण्यात येणाऱ्या सहा शासकीय निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. गरजू विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.
जिल्ह्यात लातूर एमआयडीसी, लामजना ता. औसा, तोंडारपाटी ता. उदगीर आणि मरशिवणी ता. अहमदपूर येथे मुलांच्या निवासी शाळा, तर जाऊ ता. निलंगा आणि बावची ता. रेणापूर येथे मुलींच्या निवासी शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये प्रामुख्याने इयत्ता सहावीच्या वर्गासाठी प्रवेश दिले जाणार असून, इयत्ता सातवी ते दहावीच्या वर्गांमधील रिक्त जागांवरही प्रवर्गनिहाय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
अनुसूचित जातीसाठी ८० टक्के, अनुसूचित जमातीसाठी १० टक्के, विमुक्त भटक्या जमातीसाठी ३ टक्के, विशेष मागास प्रवर्गासाठी २ टक्के आणि दिव्यांग प्रवर्गासाठी ५ टक्के जागा राखीव आहेत. प्रत्येक वर्गाची प्रवेश क्षमता ४० विद्यार्थी इतकी आहे.
प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून शैक्षणिक साहित्य, निवास, भोजन, गणवेश आणि ट्रॅक सूट यांसारख्या सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संबंधित शाळेत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक किंवा समतादूत यांच्याशी संपर्क साधावा.
दरम्यान, या प्रवेशप्रक्रियेची जनजागृती व्हावी यासाठी ‘बार्टी’ समतादूत प्रकल्पांतर्गत संपूर्ण लातूर जिल्ह्यात प्रचार व प्रसार सुरू आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी राजकुमार धनाशिरे व समतादूत पुष्पा शिंदे यांनी दिली.
