Bol Maharashtra
ब्रेकिंग महाराष्ट्र मोठी बातमी राजकारण सामाजिक

९ ऑगस्टला केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या घरावर धडकणार, १ दिवसीय लाक्षणिक उपोषणात बच्चू कडूंचा एल्गार..!

प्रतिनिधी संदिप ढाकुलकर

९ ऑगस्टला केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या घरावर धडकणार, १ दिवसीय लाक्षणिक उपोषणात बच्चू कडूंचा एल्गार..!

रक्तदानाने बच्चू कडूंच्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाची सुरुवात; आंदोलनातील शेतकऱ्यांचा सन्मान

शेतकरी कर्जमाफीच्या लढ्याला नवा आणि सकारात्मक अर्थ देत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाची सुरुवात आज रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमाने करण्यात आली. या उपोषणाच्या निमित्ताने कर्जमाफीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी व सहकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. आंदोलनातून उभ्या राहिलेल्या शेतकरी ऐक्याला यावेळी मानाचा मुजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला महादेव जानकर, विजय जावंधीया आणि वामनराव चटप यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आंदोलनाच्या काळातील संघर्षमय आठवणींना उजाळा देत, शेतकरी प्रश्नांवर पुढील लढ्याची दिशा देखील स्पष्ट करण्यात आली.

यावेळी कर्जमाफीच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी असणारे परभणी जिल्ह्यातील दिव्यांग बांधव सूर्यभान मारोती ढगे यांची रक्ततुला करण्यात आली. तसेच आंदोलनांमध्ये सातत्याने कार्यकर्त्यांची सेवा करणारे, थकलेल्या आंदोलकांची काळजी घेणारे संजय गोमकाळे यांची बिजतुला करून सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे आंदोलनातील निस्वार्थी कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

महादेव जानकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शेतकऱ्यांच्या एकजुटीच्या ताकदीमुळेच सरकारला नमावे लागले. आपण पूर्णपणे विजयी झालो नसून सुमारे ८० टक्के यश मिळाले आहे. लोक जाती-धर्मासाठी एकत्र येतात, मात्र शेतकऱ्यांसाठी एकत्र येणे अधिक गरजेचे आहे. नागपूर आंदोलनावेळी अनेक आरोप-प्रत्यारोप झाले, पण एकही शेतकरी मागे हटला नाही, त्यामुळेच सरकारला निर्णय घ्यावा लागला, असे त्यांनी नमूद केले.

विजय जावंधीया यांनी आपल्या भाषणात शेतकरी परिस्थितीवर तीव्र भाष्य केले. “आपण अत्यंत कठीण काळातून जात आहोत. दोन लाखांची कर्जमाफी झाली, पण आम्हाला माफी नको, कर्ज फेडण्याची ताकद हवी आहे. ती ताकद शेतमालाला योग्य भाव मिळाल्याशिवाय येणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत, MSP प्रत्यक्ष बाजारात मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. रामराज्याच्या आदर्शांचा उल्लेख करत, दिलेल्या वचनांची पूर्तता होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

वामनराव चटप यांनी सांगितले की, कर्जमाफीसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो तेव्हा टीका झाली, पण शेतकऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच हा निर्णय शक्य झाला. या आंदोलनात बच्चू कडू यांचा पुढाकार महत्त्वाचा होता, असे त्यांनी नमूद केले.

बच्चू कडू यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शेतकऱ्यांचे जीवन आणि कष्ट अत्यंत महत्त्वाचे आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही लढाई आजही तितक्याच ताकदीने सुरू आहे. “आंदोलनात रक्त सांडले, पण लढा थांबला नाही. समाजाला जाती-धर्मात अडकवले जात असताना शेतकरी म्हणून एकत्र येणे गरजेचे आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

ते पुढे म्हणाले, “ही कर्जमाफी हा संघर्षाचा परिणाम आहे. आम्ही गांधीगिरीने लढायचे ठरवले आहे, पण गरज पडल्यास भगतसिंगगिरीनेही पुढे जाऊ. स्वतःचे घर नसले तरी ज्यांचे घर जळाले त्यांचे घर उभारण्याची भावना या लढ्यात आहे.” या संघर्षामुळे दिव्यांग, घरकुल आणि शेतमजूर योजनांमध्येही सकारात्मक बदल झाल्याचे त्यांनी नमूद केले.

या उपोषणाच्या माध्यमातून शेतकरी प्रश्नांवर लढा सुरूच राहणार असल्याचा ठाम संदेश देण्यात आला.

*भावूक क्षण*
“ज्या कार्यकर्त्यांनी मला साथ दिली, मोठं केलं त्या कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठीच मी आज रक्तदान केलं,” असे म्हणताना बच्चू कडू भावूक झाले.

बॉक्स-
ऑगस्ट महिन्यात ९ तारखेला मोठं आंदोलन उभारणार; बच्चू कडूंचा इशारा

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी ऑगस्ट महिन्यात ९ तारखेला मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. आगामी काळात शेतकरी प्रश्नांवर अधिक आक्रमक भूमिका घेत लढा तीव्र केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी सांगितले की, आता पुढील लढा थेट केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना घेरून लढला जाईल. कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट करत, या लढ्यात प्रतीकात्मक स्वरूपात प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार सोबत घेऊन जाणार असल्याचेही सांगितले.

९ तारखेला उभारण्यात येणारा हा लढा शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचा विश्वासही बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

Related posts

लोहड़ी व मकर संक्रांति पर गोष्ठी सम्पन्न,पर्व भारतीय संस्कृति की आत्मा हैं-राष्ट्रीय अध्यक्ष अनिल आर्य

Web1Tech

लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

bol maharashtra

शिक्रापूर , सणसवडी वाहतूक कोंढी सुटणार कधी? सर्वसामान्य जनतेचा प्रश्न..!

bol maharashtra