महामार्ग अधिकाऱ्यांच्या हस्ते ‘अघोरी पूजेचे’ घाट
(हिवरा संगमच्या तरुणाचे चक्क अनिसला पत्र )
यवतमाळ (प्रतिनिधी):
नागपूर-तुळजापूर या भव्य-दिव्य महामार्गावर हिवरा (संगम) फाट्याजवळ होणारे मृत्यू रोखण्यात रस्ते विकास यंत्रणा अपयशी ठरली आहे. वारंवार विनंत्या करूनही प्रशासनाचे डोळे उघडत नसल्याने, आता संतापलेल्या ग्रामस्थांनी चक्क ‘अघोरी’ मार्गाचा अवलंब करण्याचा पवित्रा घेतला आहे. हिवरा येथील त्रस्त नागरिक हरीश भिमराव कामारकर यांनी थेट अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (ANIS) राज्य अध्यक्षांना ई-मेल द्वारे पत्र लिहून, महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते ‘अपघाती भुताचा’ बंदोबस्त करण्यासाठी अघोरी पूजा करण्याची परवानगी मागितली आहे. प्रशासकीय ढिसाळपणावर ओढलेला हा जळजळीत उपरोधिक कोरडा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
हिवरा (संगम) ता. महागाव जि. यवतमाळ येथील एकविरा देवीच्या बोर्डाजवळ महामार्ग आणि गावचा रस्ता एकत्र येतो. या ठिकाणी बायपास मंजूर असूनही त्याचे काम रखडलेले आहे, परिणामी येथे अपघातांचे सत्र सुरू असून अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. “येथे इतके अपघात झाले आहेत की गावाला आता रक्ताचे सडे पाहण्याची सवय झाली आहे,” अशी आर्त हाक कामारकर यांनी पत्रातून दिली आहे. मात्र, इतके बळी जाऊनही अधिकारी ढिम्म हलत नसल्याने, या जागेवर एखाद्या अतिशय ताकदवान ‘भुताचा’ वास असावा आणि त्या भुताने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला ‘संमोहित’ करून त्यांचे डोळे पांढरे केले असावेत, अशी खात्री गावकऱ्यांची पटली असल्याचा टोला या पत्रात लगावण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, ही बाधा दूर करण्यासाठी कामारकर यांनी १६ फेब्रुवारी रोजीच्या सोमवती अमावस्येचा मुहूर्त काढला आहे. सायंकाळी ५:३४ वाजता मांत्रिकाच्या मदतीने जाहीर पूजा-अर्चा आणि लिंबू-उतारा करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अंगात आलेली ‘आळसाची बाधा’ उतरावी यासाठी ही संपूर्ण पूजा महामार्ग प्राधिकरणाच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या हस्तेच पार पाडण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांच्या हातातील रखडलेल्या फाईल्सवरून लिंबू ओवाळले तरच कदाचित त्यांच्यातील संवेदना जागृत होतील, असा उपरोधिक चिमटाही त्यांनी काढला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे अशी अघोरी मागणी करणे हा एकप्रकारे प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा जाहीर निषेध मानला जात आहे. “जेव्हा जिवंत प्रशासकीय यंत्रणाच लोकांचे बळी घेऊ लागते, तेव्हा आम्हाला हा ‘चमत्कार’ करण्याची परवानगी मिळावी,” असे या पत्रात शेवटी म्हटले आहे. या पत्राच्या प्रती माहितीसाठी नागपूर आणि यवतमाळ येथील महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारयांनाही पाठवण्यात आल्या आहेत. आता या ‘अघोरी’ पत्राची दखल घेऊन प्रशासन बायपासचे काम मार्गी लावते की, १६ फेब्रुवारीला खरोखरच अधिकाऱ्यांच्या हस्ते पूजेची वेळ येते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
.
