कृष्णा पुसनाके,कॉम्रेड सचिन मनवर व प्रा.पंढरी पाठे यांनी दखल घेताच बोगस खवा-पेढा फॅक्टरी तात्काळ सील
यवतमाळ,दि.३ फेब्रुवारी :
यवतमाळ जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या घटनांची मालिका सुरू असतानाच,लोहारा MIDC परिसरात आज पुन्हा एकदा गंभीर व धक्कादायक प्रकार उघडकीस आला.लोहारा MIDC येथील प्लॉट क्रमांक बी–४५,ॲडिशनल एरिया,लोहारा,यवतमाळ येथे असलेल्या सवाई सिंग राज पुरोहित यांच्या मालकीच्या श्री.डी.के.बेकरी अँड नमकिन या फॅक्टरीमध्ये सुरू असलेला बोगस व भेसळयुक्त खवा-पेढा तयार करण्याचा घोटाळा काल दिनांक २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आला.सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके,कॉम्रेड सचिन मनवर व शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते प्रा.पंढरी पाठे यांनी या प्रकरणाची दखल घेताच प्रशासन हालचालीत आले आणि फॅक्टरीवर तात्काळ कारवाई करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच कृष्णा पुसनाके,सचिन मनवर व प्रा.पंढरी पाठे यांनी सहआयुक्त अन्न प्रशासन,यवतमाळचे महाजन साहेब यांना घटनास्थळी पोहोचून भ्रमणध्वनीद्वारे सविस्तर माहिती दिली.वरिष्ठ स्तरावरून तात्काळ दखल घेतल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने पावले उचलली.त्यानुसार FDA चे अन्न सुरक्षा अधिकारी अमितकुमार उपलप यांनी प्रत्यक्ष फॅक्टरीत जाऊन सखोल तपासणी व इन्व्हेस्टिगेशन केले.
तपासणीदरम्यान अंदाजे ५० ते ७० हजार रुपये किमतीचा बोगस व भेसळयुक्त खवा व पेढा आढळून आला.अन्न सुरक्षा व मानके नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होताच संबंधित फॅक्टरी तात्काळ सील करण्यात आली.यावेळी लोहारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रोहित चौधरी यांचीही उपस्थिती होती.
तपासादरम्यान आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या असून,या फॅक्टरीमध्ये एकूण चार कामगार कार्यरत असल्याचे आढळून आले.हे सर्व कामगार राजस्थानचे रहिवासी असून,त्यापैकी दोन मुलांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याची प्राथमिक माहिती आहे.तसेच फॅक्टरीचा मालक तयार केलेला बोगस खवा-पेढा गुजरातमधील कन्हैया कंपनीच्या पॅकेजिंग मटेरियलमध्ये पॅक करून बाजारात विक्री करत असल्याचे उघड झाले आहे.विशेष म्हणजे हा बोगस माल गेल्या एक ते दोन वर्षांपासून यवतमाळमध्येच तयार केला जात होता.या फॅक्टरीकडे कोणत्याही प्रकारचा वैध परवाना नसल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी अमितकुमार उपलप यांनी स्पष्ट केले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अलीकडे आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर प्रकार घडत असताना,हा नवा घोटाळा म्हणजे नागरिकांचे आरोग्य कुठल्याही प्रकारे सुरक्षित नसल्याचे भयावह वास्तव पुन्हा एकदा समोर आणणारा आहे.केवळ नफ्यासाठी जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी,अशी जोरदार मागणी होत आहे.बोगस खवा-पेढा घोटाळा उघडकीस आणून सार्वजनिक आरोग्याच्या रक्षणासाठी ठाम भूमिका घेणाऱ्या कृष्णा पुसनाके,कॉम्रेड सचिन मनवर व प्रा.पंढरी पाठे यांच्या धाडसी पुढाकाराचे सर्वत्र स्वागत होत असून,अन्न भेसळीविरोधातील लढ्याला यामुळे मोठे बळ मिळाले आहे.
