सोशल मीडियावर संतापाचा ‘विस्फोट’! यवतमाळच्या तरुणाच्या ‘अघोरी’ पत्राला लाखो नेटिझन्सचा पाठिंबा; प्रशासकीय दिरंगाईचे वाभाडे
यवतमाळ / प्रतिनिधी:
प्रशासकीय अनास्थेचे ‘भूत’ उतरवण्यासाठी यवतमाळच्या एका तरुणाने घेतलेला अघोरी पवित्रा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. हिवरा (संगम) येथील सामाजिक कार्यकर्ता हरीश भीमराव कामारकर याने थेट अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे जादूटोण्याची परवानगी मागितल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या अभिनव आंदोलनाला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर लाखो नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली असून, प्रशासनाविरुद्ध एक मोठे डिजिटल युद्ध छेडले गेले आहे.
नागपूर-तुळजापूर या ५५१ किलोमीटरच्या भव्य महामार्गाचे काम सर्वत्र पूर्ण झाले असताना, केवळ हिवरा (संगम) येथील बायपासचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले आहे. या अपूर्ण कामामुळे गावाजवळ अपघातांचे सत्र सुरू झाले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. वारंवार तक्रारी करूनही महामार्ग प्राधिकरण याकडे दुर्लक्ष करत असल्याने, हरीश कामारकर यांनी उपरोधाचा आधार घेतला. “जर विज्ञान आणि प्रशासन अपयशी ठरत असेल, तर आता भुताचा बंदोबस्त करण्यासाठी अघोरी मार्गच शिल्लक आहे,” असे म्हणत त्यांनी १६ फेब्रुवारीच्या सोमवती अमावस्येला पूजेची परवानगी मागितली आहे.
हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट होताच अवघ्या काही तासांत लाखो लोकांपर्यंत पोहोचले. इंस्टाग्रामवर या पत्राचे रील्स आणि फेसबुकवर पोस्ट प्रचंड व्हायरल झाल्या आहेत. नेटकऱ्यांनी “प्रशासनाच्या बधिरपणावर हाच योग्य उपाय आहे” अशा कमेंट्स करत हरीशच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. अधिकाऱ्यांच्या अंगात शिरलेला ‘आळस’ उतरवण्यासाठी त्यांच्या फाईल्सवरून लिंबू उतरवण्याची जी अजब मागणी हरीशने केली आहे, त्यावर नेटकऱ्यांनी मिम्स आणि पोस्टद्वारे प्रशासनाचा जोरदार उपहास केला आहे.
हरीश कामारकर यांच्या मते, महामार्ग प्राधिकरणाची यंत्रणा सध्या ‘संमोहित’ झाली आहे, ज्यांना लोकांचा आक्रोश आणि सांडणारे रक्त दिसत नाहीये. ही पूजा केवळ मांत्रिकाने नाही, तर जबाबदार अधिकाऱ्यांच्या हस्तेच पार पाडावी, जेणेकरून त्यांच्या कामातील अडथळे दूर होतील, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
सोशल मीडियावरील या तुफान प्रतिसादाने आता प्रशासकीय यंत्रणेच्या नाकी नऊ आले आहेत. केवळ एका तरुणाचे पत्र म्हणून याकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेला आता लाखो लोकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. भविष्यात या ठिकाणी अपघात झाल्यास थेट महामार्ग प्राधिकरणावर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही कामारकर यांनी दिला आहे. आता या ‘डिजिटल’ दबावानंतर तरी रखडलेला बायपास पूर्ण होणार की प्रशासन अजूनही कुंभकर्णी झोपेतच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
