आर्णीत काँग्रेसचे ‘शक्तिप्रदर्शन’; खासदार धानोरकर व माजी मंत्री शिवाजीराव मोघे देणार कार्यकर्त्यांना देणार विजयाचा कानमंत्र
( २४ फेब्रुवारीला भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन)
आर्णी / प्रतिनिधी :
आगामी काळातील राजकीय आव्हाने पेलण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणी अधिक घट्ट करण्यासाठी आर्णी तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एका भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक राज पॅलेस, महावितरण कार्यालयाजवळ सकाळी ११:०० वाजता हा मेळावा संपन्न होणार असून, चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर व माजी मंत्री अँड शिवाजीराव मोघे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या बारा वर्षांपासून आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाने निर्विवाद सत्ता प्राप्त केलेली आहे. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने घाटंजी आणि आर्णी या दोन्ही नगरपरिषदांवर आपला नगराध्यक्ष बसवून भाजपच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पाडले आहे. या विजयामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही विजयश्री खेचून आणण्यासाठी पक्षाने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याला राजकीयदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले असून, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जितेंद्र उर्फ बाळासाहेब मोघे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्याचा आणि पक्षाची आगामी रणनीती स्पष्ट करण्याचा मानस पक्षपातळीवर व्यक्त केला जात आहे. आर्णी तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष आणि कष्टकरी कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा हात अधिक बळकट करण्यासाठी आणि पक्ष संघटन तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन आर्णी तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. भाजपच्या १२ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर या मेळाव्यातून नेमका कोणता संदेश देतात, याकडे आता संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
