
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एकदिलाने मजबुतीने काम करून विजय मिळवावा पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे प्रतिपादन राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री व काँग्रेस चे जेष्ठ नेते ऍड शिवाजीराव मोघे यांनी केले.ते काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर विजयाचा गुलाल उधळणार – खासदार प्रतिभा धानोरकर
(आर्णीत पार पडला भव्य कार्यकर्ता मेळावा; माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी फुंकले प्रचाराचे रणशिंग आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आर्णीमध्ये जोरदार शड्डू ठोकला आहे. येथील ‘राज पॅलेस’ येथे आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्यास कार्यकर्त्यांचा अफाट प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात बोलताना चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महायुती सरकारवर कडाडून प्रहार केला. “नगरपालिका प्रमाणेच आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा परिवर्तन घडून आणा,” असे आवाहन करत त्यांनी आगामी निवडणुका जिंकायच्याच, असा निर्धार व्यक्त केला. यावेळी राज्याचे माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांमध्ये नवा जोम भरला. याच दरम्यान युवक काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांच्यावर जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या.
याच दरम्यान आपल्या भाषणात खासदार धानोरकर यांनी सरकारवर जहरी टीका करताना एक महत्त्वाचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, “राज्यात महायुती सरकारच्या विरोधात जनक्षोभ असून पराभवाचे स्पष्ट चित्र समोर दिसत आहे. याच पराभवाच्या धास्तीने भाजपा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाणीवपूर्वक समोर ढकलत आहे.” लोकशाहीचा गळा आवळून जनतेचा कौल घेण्यास हे सरकार घाबरत असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “लाडकी बहीण योजना चालू करून महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला, मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून महिलांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम भाजपा आणि महायुती सरकार करत आहे. केवळ निवडणुका तोंडावर आल्यावरच देवेंद्र फडणवीस सरकारला कर्जमाफीच्या चर्चांची आठवण झाली आहे.” सरकारच्या फसव्या आश्वासनांवर आणि ध्येयधोरणांवर त्यांनी यावेळी कडक शब्दांत ताशेरे ओढले.
यावेळी माजी मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे यांनी सरकारला धारेवर धरताना आदिवासी आणि ग्रामीण भागातील प्रलंबित प्रश्नांवरून निशाणा साधला. ते म्हणाले की, “हे सरकार केवळ घोषणांचे सरकार आहे. आज जल-जंगल-जमिनीचा प्रश्न गंभीर झाला असून आदिवासींच्या हक्काच्या योजनांचा निधी इतरत्र वळवला जात आहे. धनगर आणि आदिवासींमध्ये वाद लावून आपली राजकीय पोळी भाजण्याचे काम सध्याचे सत्ताधारी करत आहेत. जोपर्यंत आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकवत नाही, तोपर्यंत सामान्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. आता पेटून उठण्याची वेळ आली आहे.” या महत्त्वपूर्ण मेळाव्यास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व आर्णी चे माजी नगराध्यक्ष आरिज बेग, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र मोघे, मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक राजु गावंडे, माजी जि.प. सदस्या स्वाती येंडे, बाजार समिती सभापती अनिल आडे, आर्णी पंचायत समितीचे माजी सभापती राजु विरखेडे, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब गिरी, परसराम राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. हा मेळावा केवळ निवडणुकीची चर्चा नव्हता, तर आर्णीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या न्याय्य हक्कासाठी पुकारलेला एल्गार होता. प्रत्येक बुथवर काँग्रेसची ताकद वाढवून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जनसामान्यांचे सरकार आणण्याचा संकल्प आज सर्वांनी मिळून केला. या प्रसंगी प्रकाश वानखडे, साहिद रयानी, तालुका अध्यक्ष नरेश राठोड, सरचिटणीस प्रदिप वानखडे, सुनंदा बोक्से, विजय पाटील राऊत, कुबडे सर, नगरसेवक अमोल मांगुळकर, अमित राठोड, विजय मोघे, सुनील भारती, राहुल देवतळे, नितीन खोडे, वसंतराव जगताप, देवराव मसराम, विष्णू लोणकर, अतुल देशमुख, विनोद पंचभाई, विजय देवतळे, संजय राऊत यांच्यासह तालुक्यातील असंख्य निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “एकच जिद्द, एकच ध्यास… काँग्रेसचा विजय हाच विश्वास!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

